मराठी कविता पाऊस | Rain Poem in Marathi

मराठी कविता पाऊस | Rain Poem in Marathi


            पावसाळा हा सर्वात सुंदर ऋतू आहे , त्यामध्ये एन्जॉय करताना खूप मजा असते. जेव्हा आपला जोडीदार आपल्या सोबत असतो तेव्हा तर अशा मराठी पाऊस कविता (paus kavita in marathi ) म्हणताना खूपच रोमँटिक फील येतो. पाऊस कविता ह्या नक्कीच प्रत्येक वयात आपल्यला आवडतात, चला तर मग वेळ ना दवडता आपण गाजलेल्या मराठी पाऊस कविता (Rain poem in marathi) आपण येथे पाहणार आहोत. आवडल्यास आपल्या जोडीदारासाठी यातील एक कविता नक्कीच निवडा आणि त्याला म्हणून दाखवा, बघा मग काय जादू होईल............


    पाऊस कविता - शांता शेळके

    मराठी कविता पाऊस | Rain Poem in Marathi

                       पावसाच्या कविता ( Rain poems in Marathi ) म्हटल्यानंतर शांता शेळके यांचे नाव येणार नाही ते तर अशक्यच आहे, शांता शेळके आणि पाऊस हा तर विषय वेगळा आहे. आपण यामध्ये शांता शेळके यांच्या पाऊस कविता बघणार आहोत, कारण त्यांनी मराठी कवितेवर अधिराज्य गाजवले त्या जेष्ठ आणि श्रेष्ठ अशा कवित्री होत्या. चला तर बघूया शांता शेळके यांच्या पाऊस कविता. 





    1) साद पावसाची

    साद पावसाची आली, शहारली माती

    भुई सवे आभाळाची, जुळे आज प्रीती

    उठावले घन घन घोर, नील कंठ झाले मोर

    पिसार्यात लाखो डोळे, गगन न्याहाळीती

    निळामधे हीरक जडती, तसे शुभ्र बगळे उडती

    कोसळती धारा धारा, दिशा धुंद होती

    चिंब चिंब जांभुळ रानी, मेघ मंद्र घुमती गाणी

    मुके भाव हृदया मधले, शब्द रूप होती

    तृप्त शांत झाली धरणी, मधुस्म्रिते हिरव्या कुरणी

    पुसट चुंबना सम ओल्या सरी येती जाती

    गगन धरा झाली एक, मुक्त प्रीतिचा अभिषेक

    एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रतीती

    - शांता शेळके




    2) आला पाऊस


    आला पाऊस मातीच्या वासांत ग

    मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग

    आभाळात आले, काळे काळे ढग

    धारा कोसळल्या, निवे तगमग

    धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥

    कोसळल्या कश्या, सरीवर सरी

    थेंब थेंब करी नाच पाण्यावरी

    लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥

    लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली

    वारा दंगा करी, जुइ शहारली,

    चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥

    झाडांवरी मुके, पाखरांचे थवे

    वीज लालनिळी, कशी नाचे लवे

    तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥

    वीज कडाडतां, भय दाटे उरीं

    एकलि मी इथे, सखा राहे दुरी

    मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥

    – शांता शेळके




    3) भरुन मेघ आले


    ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले

    डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले

    साद ओली पाखराची ओढ जागे पावसाची

    डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला

    वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला

    थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले

    स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी

    राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी

    तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले

    हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा

    शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू

    अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले

    – शांता शेळके




    4) ऋतु हिरवा


    ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।युग विरही हृदयांवर सरसरतो
     मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।

    भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती ।

    नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा ।।

    मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण ।

    भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण ।।

    थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा ।।

    नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू ।

    गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा ।।

    – शांता शेळके




    5) पाऊस

    पावसाच्या धारा येती झरझरा

    झांकळलें नभ, वाहे सोंसाट्याचा वारा

    रस्त्याने ओहोळ जाती खळखळ

    जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

    ढगावर वीज झळके सतेज

    नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

    झोंबे अंगा वारे काया थरथरे

    घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें

    हर्षलासे फार नाचे वनीं मोर

    पानांतून हळूं पाहे डोकावून खार

    पावसाच्या धारा डोईवरी मारा

    झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा

    नदीलाही पूर लोटला अपार

    फोफावत धांवे जणू नागीणच थोर

    झाडांची पालवी चित्ताला मोहवी

    पानोपानी खुलतसें रंगदार छबी

    थांबला पाऊस उजळे आकाश

    सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

    किरण कोंवळे भूमीवरी आले

    सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले

    सुस्नात जाहली धरणी हांसली,

    वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली

    – शांता शेळके




    6) पाऊस आला,

    पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।

    थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू ।।

    गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड ।

    अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू ।।

    अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब ।

    ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू ।।

    ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे ।

    इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू !

    – शांता शेळके


    7) वादलवारं सुटलं गो

    वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।

    भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,

    सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।

    वादलवारं सुटलं गो !

    गडगड ढगांत बिजली करी ।

    फडफड शिडात धडधड उरी ।

    एकली मी आज घरी बाय ।

    संगतीला माझ्या कुनी नाय ।

    सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,

    जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।

    वादलवारं सुटलं गो !

    सरसर चालली होडीची नाळ ।

    दूरवर उठली फेसाची माळ ।

    कमरेत जरा वाकूनिया ।

    पान्यामंदी जालं फेकूनिया ।

    नाखवा माजा, दर्याचा राजा,

    लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।

    वादलवारं सुटलं गो !

    – शांता शेळके


    मंगेश पाडगावकर यांच्या कविता


    मराठी कविता पाऊस | Rain Poem in Marathi




    मंगेश पाडगावकर हे सुप्रसिद्ध मराठी कवी असून त्यांच्या कवितेच्या माध्यमातून माणूस जगायला शिकतो, अशाच मंगेश पाडगावकर यांच्या (Paus kavita ) कविता आपण या लेखांमध्ये बघणार आहोत या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या असून, त्या वाचण्यास खूप खूप आनंद होतो. मंगेश पाडगावकर यांच्या कविता खास तुमच्यासाठी..............




    8) बाहेर बरसती धारा रे



    बाहेर बरसती धारा रे

    मधुनीच वीज थरथरते

    क्षण प्राण उजळुनी विरते

    करी अधिक गहन अंधारा रे

    बाहेर बरसती धारा रे

    स्थिर अचल दिशांतुन दाही

    निःशब्द वेदना काही

    का व्याकुळ आज किनारा रे

    बाहेर बरसती धारा रे

    मी उन्मन, काही सुचेना

    लाटांत निमंत्रण प्राणां

    भरतीत मलाच इशारा रे

    बाहेर बरसती धारा रे

    हे मुक्त अनावर सगळे

    आकाश इथून मज दिसले

    घर गमे आज मज कारा रे

    बाहेर बरसती धारा रे

    मी उन्मन, काही सुचेना

    लाटांत निमंत्रण प्राणां

    भरतीत मलाच इशारा रे

    बाहेर बरसती धारा रे


    – मंगेश पाडगावकर




    9) रात्र पावसाची



    भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

    धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।

    कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।

    आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।

    तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।

    क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती ।

    नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती ।

    तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।

    केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।

    ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।

    श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।

    सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास ।

    स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास ।

    सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।


    – मंगेश पाडगावकर



    10) पाऊस आला


    पाऊस आला,
    पाऊस आला,
    पाऊस आला घरांवर,
    पाऊस आला स्वरांवर,
    पाऊस आला नाचणाऱ्या मोरांचा,
    पाऊस आला


    पाऊस आला वाऱ्याव्या श्वासाचा,
    मातीच्या वासाचा,
    हिरव्या हिरव्या ध्यासाचा;
    करीत आला वेड्याचा बहाणा,
    पाऊस आला आतून आतून शहाणा.

    पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा,
    राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा,
    पाऊस आला गोकुळातल्या माळावर,


    पाऊस आला यशोदेव्या भाळावर,
    पाऊस आला उनाडणारा गोवळा,

    पाऊस आला पालवीसारखा कोवळा.

    येथै येथै पाऊस आला,
    तेथै तेथै पाऊस आला,
    ताथै ताथै पाऊस आला.


    फुलण्याचा उत्सव होऊन
    पाऊस आला,
    झुलण्याचा उत्सव होऊन
    पाऊस आला.


    पावसाने या जगण्याचा उत्सव केला,
    पावसाने या मरण्याचा उत्सव केला.


    जगणं आणि मरण,
    बुडणे आणि तरणं,
    यांच्या पल्याड कुठे तरी पाऊस आला.


    पाऊस आला याद घेऊन,
    ओली चिब साद घेऊन.


    बाहेर जरी ढगातून पाऊस आला,
    खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला,
    पाऊस आला.
    - मंगेश पाडगावकर



    11) असाही पाऊस



    गडगडत, बडबडत, उनाडत,

    पाऊस येतो धपाधपा कोसळत,

    सामोरा, सैरावैरा, अस्ताव्यस्त,

    त्याला नाही मुळीच सोसत

    कोणीही त्याखेरीज लक्ष कुठे दिलेले!

    पाऊस महासोंगाड्या रहतो उभा

    देवळापुढल्या फूटपाथवर भाविकपणे,

    पुटपुटत करू लागतो नामजप श्रद्धेने,

    आणि मग अकस्मात खो-खो हसत

    लगट करतो एखाद्या नाजूकरंगीत छत्रीशी!

    झाडांना झोबत येतो,

    पारंब्याना लोबत येतो,

    डोगराची उशी घेतो,

    नदीला ढुशी देतो!

    शाळेपुढल्या गल्लीत पाऊस

    नव्यानेच सायकल शिकतोय तसा वाटतो!

    वैतागलेला मिशीदार हवालदार

    तसा पाऊस कधी कधी

    घोगऱ्या सुरांत डाफरतो!

    मुंबईतल्या भैयासारखा पाऊस कधी

    दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची

    याद येऊन उदास होतो,

    आणि मग एकसुरी आवाजात

    एकटा एकटा

    तुलसीचे रामायण गाऊ लागतो!

    पाऊस माझ्या खिडकीत येतो,

    काय सांगू? सपशेल नागडा!

    कमीत कमी लंगोटी?

    तिचासुद्धा पत्ता नसतो!

    हुडहुडी भरलल्यासारखी

    माझी खिडकी थडाथडा वाजू लागते!

    सपकारत खिडकीतून मला म्हणतो :

    " उठ यार, कपडे फेक, बाहेर पड,

    आजवर जगले ते कपडेच तुझे,

    एकदा तरी चुकून तू जगलास काय?

    बाहेर पड, कपडे फेकून बाहेर पड,

    गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया! "

    - मंगेश पाडगावकर



    ग. दि. माडगूळकर यांच्या कविता

    मराठी कविता पाऊस | Rain Poem in Marathi


    12)कोसळती धारा


    घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।


    केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।


    कालिंदीच्या तटी श्रीहरी ।


    तशात घुमवी धुंद बासरी ।


    एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥


    कोसळती धारा ।।


    वर्षाकालिन सायंकाली


    लुकलुक करिती दिवे गोकुळी ।


    उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥


    कोसळती धारा ।।


    कृष्णविरहिणी कोणी गवळण ।


    तिला अडविते कवाड, अंगण ।


    अंगणी अवघ्या तळे साचले,
    भिडले जल दारा कोसळती धारा ॥३॥
    – ग. दि. माडगूळकर


    11) मोहन कुणीकडे

    रिमझिम पाऊस पडे सारखा,

    यमुनेलाही पूर चढे,

    पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,

    गेला मोहन कुणीकडे ।।

    तरुवर भिजले भिजल्या वेली,

    ओली चिंब राधा झाली,

    चमकुन लवता वरती बिजली,

    दचकुन माझा ऊर उडे ग बाई,

    गेला मोहन कुणीकडे ।।

    हाक धावली कृष्णा म्हणुनी,

    रोखुनी धरली दाही दिशानी,

    खुणाविता तुज कर उंचावुनी,

    गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,

    गेला मोहन कुणीकडे ।।

    जलाशयाच्या लक्ष दर्पणी,

    तुझेच हसरे बिंब बघुनी,

    हसता राधा हिरव्या रानी,

    पावसातही ऊन पडे, ग बाई,

    गेला मोहन कुणीकडे ।।
    – ग. दि. माडगूळकर




    पहिला पाऊस कविता मराठी (Pahila paus kavita)



    12)पाऊस गातो गाणे


    टिप टिप पाऊसझो झो वारा
    गीत गाऊ पाहतो
    आसमंत सारा

    कडाडणारी वीज
    गडगडणारे ढग
    धावण्यार्‍या छत्रीतली
    आपली लगबग

    डराव्‌ डराव्‌ बेडकं
    छम छम तळे
    लेझीम हाती घेऊनी जणू
    थेंब लाटेवर पळे

    खळ खळ झरा
    तड तड पत्रा
    पावसाने भरवली बघा
    ताला सुरांची जत्रा



    13)तू मी आणि पाऊस


    चिंब भिजुन पावसातमन जाऊन बसतं ढगात
    मोहरतात साऱ्या भावना
    आठवणींच्या कृष्ण-धवल जगात

    विजांसोबत सुरु होतो
    मग ढगांचा लपंडाव
    आठवणींनी पुन्हा गजबजतो
    माझ्या मनातील उजाड गांव

    कधी साकारते इंद्रधनु
    उन्हासवे ओल्या पावसात
    आठवणींना मग येतो बहर
    रंगांनी सजल्या दिवसात

    ओंजळीत गर्द अळवाच्या
    चमकतात थेंब तेजाचे
    आठवणींच्या धुंद धुक्याला
    नवकोंदण तव प्रेमाचे

    कधी संतत धार पावसाची
    कधी साथ तिस वादळाची
    कधी फुले बाग आठवांची
    कधी वाहे सरिता आसवांची

    सागराचा उग्र अवतार
    सोबतीस पर्जन्य वारा
    आठवांच्या रोखण्या ऊधाणा
    तोकडा मनीचा किनारा

    दररोज घडे श्रावणात
    मेळ ऊन पावसाचा
    सोबतीस माझ्या सदैव
    हा खेळ संचिताचा


    14)आला पह्यला पाऊस




    आला पह्यला पाऊसशिपडली भुई सारी
    धरत्रीचा परमय
    माझं मन गेलं भरी
    आला पाऊस पाऊस
    आतां सरीवर सरी
    शेतं शिवारं भिजले
    नदी नाले गेले भरी
    आला पाऊस पाऊस
    आतां धूमधडाख्यानं
    घरं लागले गयाले
    खारी गेली वाहीसन
    आला पाऊस पाऊस
    आला लल्‌करी ठोकत
    पोरं निंघाले भिजत
    दारीं चिल्लाया मारत
    आला पाऊस पाऊस
    गडगडाट करत
    धडधड करे छाती
    पोरं दडाले घरांत
    आतां उगूं दे रे शेतं
    आला पाऊस पाऊस
    वर्‍हे येऊं दे रे रोपं
    आतां फिटली हाऊस
    येतां पाऊस पाऊस
    पावसाची लागे झडी
    आतां खा रे वडे भजे
    घरांमधी बसा दडी
    देवा, पाऊस पाऊस
    तुझ्या डोयांतले आंस
    दैवा, तुझा रे हारास
    जीवा, तुझी रे मिरास



    15) शेतकरी आणि पाऊसाची आस


    नजर एकटक ती आकाशावरपडणार
     कधी पाऊस धरतीवर
    शेत तहानले ते त्रासले जनावर
    अधीर मन जाईल का फासावर

    अवकाळी नुकसान दरवेळी घात
    सावरतील कां दिवस अंधारी रात
    गरीबाच्या दारी पडेल का प्रकाश
    हाती संजीवनी कि वाढेल जकात

    दलालखोरी आता जीव काढू लागली
    सरकारी परवाने त्यांना भेटू लागली
    करेल का कुणी तरी आमचा विचार
    कि यंदाही आम्ही फासावरच जाणार






    16) पाऊस आलाय?....भिजून घ्या




    पाऊस आलाय?.भिजून घ्या
    थोडा मातीचा गंध घ्या
    थोडा मोराचा छंद घ्या
    उरात भरून आनंद घ्या..
    आलाय पाऊस?..भिजून घ्या

    बघा समुद्र उसळतोय
    वारा ढगांना घुसळतोय
    तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
    आलाय पाऊस?..भिजून घ्या

    ऑफ़ीस रोजच गाठत असतं
    काम नेहमीच साठत असतं
    मनातून भिजावंसं वाटत असतं
    मनाची हौस पुरवून घ्या..
    आलाय पाऊस?..भिजून घ्या

    सर्दी पडसे रोजचेच..
    त्याला औषध तेच तेच..
    प्यायचेच आहेत नंतर काढे ,
    आधी अमृत पिऊन घ्या..
    आलाय पाऊस?..भिजून घ्या

    बघा निसर्ग बहरलाय
    गारव्याने देहही शहारलाय
    मनही थोडं मोहरून घ्या..
    आलाय पाऊस?..भिजून घ्या




    17) पुन्हा कालचा पाउस कविता मराठी



    आत्ता पावसाळा येईल
    मन पुन्हा ओलं होईल
    छत्री उघडू उघडू म्हणता
    चिंब चिंब होऊन जाईल

    कुणी तरी पावसा कडे
    डोळे लाउन पहातंय
    मळभ दाटल्या डोळ्यांचं
    मन मात्र गातय

    पाउस कधी मुसळधार
    पाउस कधी रिपरीप
    पाउस कधी संततधार
    पाउस कधी चिडीचीप

    आभाळभर डोळे आता
    शोधत आहेत पाउस
    कुणालाच दिसत नाही
    पापण्यांमधला पाउस

    खोल आठवणीचं बीज
    अंकुरून येतं मनावर
    वसंतात छाटलं असलं
    तरी मन नसतं भानावर


    18) परतीचा पाऊस



    ढगांचा गडगडाट आणि
    विजांचा कडकडाट
    ओल्या मातीचा कोवळा गंध
    चालला तो चिंब
    वसुंधरेला भिजवून सृष्टीला विजयाची देऊनी सलामी
    परतूनी चालली पावसाची स्वारी

    श्रीगजाननावरती वाहूनी अक्षता
    नवरात्रीत अंबेमातेसोबत
    रास तो खेळला
    ढोलताशांसंगे रंगत त्याची न्यारी
    परतूनी चालली पावसाची स्वारी
    इंद्रधनुचे नभी उधळूनी रंग
    ढगांचे पुंजकेही झाले खेळात दंग
    रेशमाच्या सरींचा
    इंद्रधनुचे नभी उधळूनी रंग
    ढगांचे पुंजकेही झाले खेळात दंग
    पानाफुलासोबत संग रोमांचित झाले
    सृष्टीचे अंग अंग




    19)  का रं पावसा असा


    का रं पावसा असा

    कहर अवेळी मांडला?
    शेतकरी राजा माजा
    पार ओरबाडूनी गेला !

    ग्याल सारं पिकपाणी
    स्वप्न पण विखुरली,
    घामाची, कष्टाची त्याज्या
    झोळी पण रीती झाली !


    नको रं असा कोसळु
    ठेव जाणिव लेकरांची,
    ऐकलसा खुप शिव्याशाप
    आता घे दुवा तरी त्यांची !


    झाल गेलं तो विसरतो
    जुपल पुन्हा तो कामाला,
    दिवु नकोस रं तू दगा
    अजाबात पुढल्या वक्ताला !




    20) पाऊस आलाय…पाऊस आलाय….भिजून घ्या


    पाऊस आलाय…पाऊस आलाय….भिजून घ्या
    थोडा मातीचा गंध घ्या
    थोडा मोराचा छंद घ्या
    उरात भरून आनंद घ्या..
    आलाय पाऊस…..भिजून घ्या
    बघा समुद्र उसळतोय
    वारा ढगांना घुसळतोय
    तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
    आलाय पाऊस…..भिजून घ्या
    ऑफ़ीस रोजच गाठत असतं
    काम नेहमीच साठत असतं
    मनातून भिजावंसं वाटत असतं
    मनाची हौस पुरवून घ्या..
    आलाय पाऊस…..भिजून घ्या
    सर्दी पडसे रोजचेच..
    त्याला औषध तेच तेच..
    प्यायचेच आहेत नंतर काढे ,
    आधी अमृत पिऊन घ्या..
    आलाय पाऊस…..भिजून घ्या
    बघा निसर्ग बहरलाय
    गारव्याने देहही शहारलाय
    मनही थोडं मोहरून घ्या..
    आलाय पाऊस…..भिजून घ्या
    – नितेश होडबे




    21) अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ 



    अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।
    ढगाला उन्हाची केवढी झळ ।थोडी न्‌ थोडकी लागली फार ।
    डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।
    वारा वारा गरागरा सो सो सूम्‌ ।
    ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।
    वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।
    आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।
    खोलखोल जमिनीचे उघडून दार ।
    बुडबुड बेडकाची बडबड फार ।
    डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।
    साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।।


    – संदीप खरे


    22) पहिला पाऊस आणि तुझी आठवण…




    पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण….एकाच छत्रीत कणीस खात मनसोक्त आनंद
    समुद्रकाठी जाऊन येणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श
    तुझ्या जवळ असण्याने येणारी शिरशिरी
    न सांगताही वाफळलेली कॉफी तू माझ्यासाठी विकत घेणं
    आजूबाजूला बसलेल्या लोकांची पर्वा न करता एकमेकात गुंतून जाणं
    न बोलता फक्त त्या पावसाची मजा घेणं
    न बोलता तू मला आणि मी तुला समजून घेणं
    आता आठवणीतल्या तुला जपूनही तू माझं असणं मला कधी तुझ्यापासून दुरावू नाही शकलं
    पण पाऊस असा आला की फक्त तुझं असणं जास्त गरजेचं….
    पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण…


    – दिपाली नाफडे


    23) ढग दाटूनि येता




    ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।
    झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।
    माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।
    तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।
    मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।
    ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
    झिम्मड पाण्याची ……
    सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।
    झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।
    सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।
    जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।
    साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।
    शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।
    ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
    झिम्मड पाण्याची …….
    -अशोक पत्की


    24) पावसात जाऊ




    टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ ।।
    भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
    गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।
    आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
    गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू ।।
    ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।
    पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।
    फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।
    “ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।
    पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।
    चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ?


    – श्रीनिवास खारकर


    25) गहिवरला मेघ नभी



    केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
    गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
    पापणीत साचले, अंतरात रंगले ।
    प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
    ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।
    भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले ।
    धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले ।
    डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले ।
    स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले ।
    झाडावरी दिसला ग भारला चकोर ।।


    – अशोक परांजपे




    26) श्रावणधारा




    झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात।
    प्रियाविण उदास वाटे रात ।।

    बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम ।
    आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात ।।

    प्रियाविण उदास वाटे रात ।।

    प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता ।

    बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात ।।
    प्रियाविण उदास वाटे रात ।।

    मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी ।
    वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात ।।

    प्रियाविण उदास वाटे रात ।।


    – पी. सावळाराम


    27) पाऊस


    दरवर्षीप्रमाणे यंदाही तो मनसोक्त बरसला, 

    जमिनीशी मिलन झाल्याच्या आनंदात हलकेच हसला

    याही वर्षी दरवळला मातीचा सुगंध,

    थंडगार वाऱ्याच्या स्पर्शाने शहारले सर्वांग

    यंदाही नकळत तिच्यासाठी चार ओळी स्फुरल्या,

    मनातल्या भावना अलगद ओठांवर तरळल्या

    ओठांवरील शब्द लागलीच कागदावर उतरवले,

    तिच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ते लिफाफ्यात बंद केले

    बरेच महिने तिच्याशी संवाद न झाल्यामुळे मन थोडे उदास होते,

    मात्र आता हातातल्या लिफाफ्याने मनाला पुन्हा प्रफुल्लित केले होते

    तडक उठलो, दारामागे लटकवलेली छत्री घेतली,

    पत्र छातीशी कवटाळलेआणि पावलं पोस्टाकडे वळवली

    मनात थोडीशी धाकधुक होती, 

    आता तरी तिचा राग जाईल का याची चिंता होती

    दूर सारुन साऱ्या विचारांना, प्रसन्न मुद्रेने दरवाजा उघडला,

    इतक्यात तिच्या गावचा पाहुणा लग्नाची पत्रिका घेऊन उंबऱ्यात धडकला


    – वेद बर्वे


    28) श्रावणमासी




    श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
    क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
    वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
    मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ।।
    झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे ।
    तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
    उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
    सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा ।।
    बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
    उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
    फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
    सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
    खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
    मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।
    सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
    पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।


    – बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे


    29) परतीचा पाऊस


    खरा तर मी भाद्रपदातलाकुणी म्हणे मला परतीचा,
    गडगडाटाने मुद्दाम आलो
    ठेउन मान तुमच्या प्रेमाचा !
    मधल्या काळात रूसलो
    आभाळातच लपुन बसलो,
    चिडले सगळेच माझ्यावर
    म्हणुन जाता जाता बरसलो !
    पाहुन हिरवी चादर भुईवर
    मन कस मग भरून येतं,
    तोडू नका हो झाडं तुम्ही
    मग मलाही बरसावं वाटतं !
    दयाल वचन मला तुम्ही
    वसुंधरा ठेवणार हिरवीगार?
    ठेवुन लोभ तुम्हावर असाच
    पुढल्या वर्षी परत येणार !
    चार महिने पुरे झालेत
    तुमच्याकडे गावी येउन,
    रामराम स्विकारा माझा
    चाललो मी परत निघुन!


    – शिवाजी सांगळे


    30) शेतकर्‍याच्या नशिबात


    हाती आलेलं पीकभीजलं डोळयादेखत
    शेतकर्‍याच्या नशिबात
    सदाच वाईट वखत
    मधेच कुठे गायब होतो
    वेळेवर चींब भीजवतो
    दान देतानाही असा का
    हाहाकार तो माजवतो


    – रघुनाथ सोनटक्के



    या मराठी पाऊस कविता तुम्हाला कशा वाटल्या सांगायला विसरू नकाआणि यामध्ये काही सजेशन असल्यास नक्की कमेंट करा. अशाच वेगवेगळ्या कविता आणि वेगवेगळ्या मराठी आर्टिकल साठी माझ्या या ब्लॉगला नेहमी भेट देत रहा.
     धन्यवाद |


    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.